हर्षवर्धन जाधव आणि शांतिगिरी महाराज ठरणार खैरेंना अडसर

Foto

औरंगाबाद-  लोकसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. शिवसेना आणि भाजपाची युतीबाबत चर्चा नाही. तर काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने आपला हक्‍क सांगितल्याने जागेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी शांत बसून आहेत. तर शिवसेनेचे खासदार मात्र जोरदारपणे कामाला लागले असले तरी खा. चंद्रकांत खैरे यांच्या वाटेत आ. हर्षवर्धन जाधव आणि शांतीगिरी महाराजांकडून आडकाठी आणली जाणार आहे असे दिसते.


लोकसभेची निवडणूक मे महिन्यात होणार असून, देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहे. असे असताना महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये  युती होण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा सुरू नाही. दोन्ही पक्षाच्यावतीने राज्यातील 48 जागांवर उमेदवार उभे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण युती झाली नाही तर दोन्ही पक्षांच्या जागा घटतील हे पक्ष नेत्यांना माहीत असल्याने इच्छुक भावी खासदार कामाला लागावे की नाही या संभ्रमात आहेत. भाजपाची अवस्था जिल्ह्यात अशीच झाली आहे. त्यामुळे भाजपाच्या इच्छुकांमध्ये घालमेल सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्युला वापरून 24-24 जागांचे वाटप करून घेतले. त्यापैकी 40 जागांवर दोन्ही पक्षाचे एकमत झाले. चार जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या. उर्वरीत चार जागा आदला बदली करण्यावरून वादात आहेत. त्याचा तिढा दिल्‍लीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांत सोडविला जाणार आहे. औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेसची आहे. त्यावर सध्या राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात अद्याप शांतता आहे.

 

हर्षवर्धन जाधव आणि शांतिगिरी महाराज ठरणार खैरेंना अडसर

शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे हे हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करीत चार वेळा निवडून आले. पण यावेळी मात्र खा. खैरेंना पराभूत करण्यासाठी मित्र पक्ष भाजपासह कन्‍नडचे  आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना निवडणुकीत पराभूत करण्याचा पण उचलला आहे. ते निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.तसेच शांतीगिरी महाराज निवडणूक अखाड्यात उतरणार आहेत. त्यामुळे खैरेंच्या हिंदू मतांची फूट अटळ असल्याने खैरेंचा मार्ग अडथळ्याचा ठरणार आहे.